सावरगाव मुंढे येथे सेंट आरसेटी बुलढाणा यांचे दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण संपन्न.
उध्दव नागरे लोणार तालुका प्रतिनिधी :
सावरगाव मुंढे ( तांडा ) येथे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बुलढाणा ( आरसेटी ) यांचे दहा दिवसीय दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. प्रशिक्षण संस्थेचे संचालक संदीप पोटे व प्रशिक्षक स्वप्नील गवई, उपसरपंच बळीराम राठोड आणि संपूर्ण टिम यांनी या प्रशिक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात गावातील 35 पुरूषांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण हे सामाजिक उपक्रम घेण्यात आले. प्रशिक्षण संस्थेकडून विषय तज्ञ प्रशिक्षक म्हणून ऋषीकुमार फुले पुणे यांची निवड करण्यात आली होती.
या प्रशिक्षणामध्ये फुले यांनी दुग्धव्यवसायासाठी गाई म्हशींच्या जाती, दुधाळ जनावरांची निवड, जनावरांची वाहतूक, नविन खरेदी केलेल्या जनावरांचे व्यवस्थापन, प्रजनन, कृत्रिम रेतन आणि सेक्स ( सॉर्टेड ) सीमेन चा वापर करून व्यवसायात जलद गतीने वाढ, गाभण काळात जनावरांची काळजी, प्रसूती, नवजात वासरांची काळजी, गोठ्यात कालवडी व वघार यांचे संगोपन, आजची कालवड उद्याची गाय याचे महत्व, चारा व्यवस्थापन, अझोला, मुरघार, हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, रोग व लसीकरण, आजार व्यवस्थापन, जंत निर्मुलन, शुद्ध दुध निर्मिती, दुध काढण्यासाठी मशीनचा उपयोग व काळजी, गोठा बांधणी, मुक्त संचार गोठ्याचे फायदे, गोठ्याचे आर्थिक नियोजन व दिनक्रम, गांडूळखत तयार करून विक्री व्यवस्थापन, शेतीमधील गांडूळखताचे महत्व, मार्केटिंग, प्रकल्प भेट आणि जनावरांचा विमा हे विषय सविस्तर व सर्वांना समजेल अशा भाषेत शिकवले.
याचबरोबर प्रशिक्षण संस्थेचे संचालक संदीप पोटे सर यांनी बॅकेची माहिती, कर्ज प्रकरण तयार करणे, प्रकल्प अहवाल, विविध शासकीय योजना तसेच विविध महामंडळ व त्याचे लाभ हे समजावून सांगितले. संस्थेचे प्रशिक्षक स्वप्नील गवई यांनी उद्योजकीय सक्षमता, ध्येय निश्चिती, आईस ब्रेकिंग व टाॅवर बिल्डींग हे खेळ घेऊन प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी प्रेरित केले.
त्याचबरोबर गावातील तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून 55 तरुणांनी रक्तदान केले. तसेच संस्थेकडून वृक्षारोपण करून “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सावरगाव मुंढे उपसरपंच बळीराम राठोड, अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सावरगाव मुंढे ( तांडा ), गावातील तरूण मंडळ, ग्रामपंचायत सदस्य यानी पाठपुरावा करून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
या प्रशिक्षणार्थ्यांचे शेवटच्या दिवशी नॅशनल ॲकॅडमी ऑफ रूडसेट यांच्याकडून मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सर्व 35 विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले. संस्थेकडून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सांगता समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील गवई यांनी केले. कार्यक्रमाचा आभिप्राय गणेश राठोड, उमेश जाधव यांनी दिली व आभार उपसरपंच बळीराम राठोड यांनी मानले.