Take a fresh look at your lifestyle.

५ जी लिलाव चौथ्या दिवसावर

तीन दिवसांत ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावाच्या बोलीच्या १६ फेऱ्या पूर्ण झाल्या असून शुक्रवारीदेखील लिलाव सुरू राहणार आहे

0

नवी दिल्ली : अतिवेगवान, नवयुगातील सेवा आणि व्यवसाय प्रारूपांची पायाभरणी करणारा ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावाची प्रक्रिया चौथ्या दिवसापर्यंत लांबली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या लिलावाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी सोळाव्या फेरीअखेर एकंदर १,४९,६२३ कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

तीन दिवसांत ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावाच्या बोलीच्या १६ फेऱ्या पूर्ण झाल्या असून शुक्रवारीदेखील लिलाव सुरू राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. कोणत्या ध्वनिलहरींसाठी कोणत्या कंपनीकडून सर्वाधिक बोली आल्या या तपशिलाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अजूनही सरकारकडून देण्यात आलेली नाही.

चालू लिलावात ७०० मेगाहट्र्झ ध्वनिलहरींसाठी मिळालेल्या समाधानकारक प्रतिसादाबद्दल वैष्णव यांनी आनंद व्यक्त केला. याआधी २०१६ आणि २०२१ मध्ये ध्वनिलहरींच्या झालेल्या शेवटच्या दोन लिलावांमध्ये ७०० मेगाहट्र्झ ध्वनिलहरींसाठी एकही बोली प्राप्त झाली नव्हती.

कोणत्या दिवशी किती बोली?

पहिल्या दिवशी ५ जी ध्वनिलहरींसाठी १,४५,००० कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. दुसऱ्या दिवसाअखेर त्यात ४,६२३ कोटींची भर पडत बुधवारी नवव्या फेरीअखेर १,४९,५४५ कोटी रुपयांच्या एकूण बोली लागल्या. तर गुरुवारी तिसऱ्या दिवशी सोळाव्या फेरीअखेर त्यात केवळ ७८ कोटींची भर पडू शकल्याचे दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.