७/१२ची साडेसाती फिटली; जमिनीच्या नोंदींसाठी दिशादर्शक प्रकल्प
सात-बारा उताऱ्यांवर होणाऱ्या वारस नोंदी, बॅंक कर्ज बोजा, खरेदीखताद्वारे होणाऱ्या मालकीहक्काच्या व इतर नोंदींच्या कामासाठी शेतकऱ्यांना अनेकदा चकरा माराव्या लागत होत्या.
अहमदनगर : सात-बारा उताऱ्यांवर होणाऱ्या वारस नोंदी, बॅंक कर्ज बोजा, खरेदीखताद्वारे होणाऱ्या मालकीहक्काच्या व इतर नोंदींच्या कामासाठी शेतकऱ्यांना अनेकदा चकरा माराव्या लागत होत्या. आता महसूल विभागाने शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी जमिनीच्या नोंदींसाठी जिल्ह्यात दिशादर्शक प्रकल्प हाती घेतला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे संकल्पनेतून अहमदनगर जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवीन ॲप किंवा सुलभ प्रणाली विकसित करण्याची हालचाल सुरू झाली आहे.
नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक विविध बाबी, विकासाच्या योजना, जमीन महसूल आणि गौण खनिज करवसुलीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व प्रांताधिकारी व सर्व तहसीलदार उपस्थित होते. आयुक्त गमे यांनी वारस नोंदी व इतर नोंदींच्या प्रक्रियेत गतिमानता व सुलभीकरण आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत सूचना दिल्या.
सध्याच्या परिस्थितीत वारस नोंदीसाठी किंवा अन्य नोंदीसाठी किती अर्ज आले आहेत, किती अर्जांची निर्गती झाली, किती अर्ज प्रलंबित आहेत. याचा डाटा केंद्रीय स्वरूपात उपलब्ध होणे, ही प्रक्रिया किचकट आहे. महसूल विभागाकडे नोंदीसाठी आलेल्या अर्जाची स्थिती गती कळण्यासाठी नवीन संकल्पना राबविण्याच्या सूचना दिल्या. नवीन संकल्पना सुलभ असावी असावी. अहमदनगर जिल्ह्यात दिशादर्शक प्रकल्प म्हणून याची सुरवात करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निर्देशात जिल्हा प्रशासनाने याबाबत चाचपणी सुरू केली आहे. वारस व इतर नोंदींच्या संदर्भात अभिनव ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्राथमिक बैठक
महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील तज्ञ नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी कूळकायदा शाखेच्या तहसीलदार सुनीता जऱ्हाड, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे, मंडलाधिकारी धुळाजी केसकर, मंडलाधिकारी वृषाली करोशीय, मंडलाधिकारी रूपाली टेमक, संतोष मांडगे, प्रकाश शिरसाठ तसेच कूळकायदा शाखेतील अव्वल कारकून विशाल नवले आदी प्राथमिक बैठकीला उपस्थित होते.
सात-बारा उतारा कामात गतीमानता व सूसुत्रता येणार आहे. ही प्रणाली तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.