Take a fresh look at your lifestyle.

देवदर्शन करून गावाकडे निघालेला टेम्पो उलटला, चौघांचा मृत्यू

मालेगाव (नाशिक) - टेम्पो उलटला, चौघांचा मृत्यू

0

मालेगाव (नाशिक) – चंदनपुरी येथून देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतणाऱ्या मुंदखेडे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील भाविकांचा ४०७ टेम्पो (Tempo) (एमएच १९ बीएम ०१०२) मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गिगाव फाट्याच्या गतिरोधकाजवळ उलटला. (Tempo Reversed) अपघातात चार जण ठार (Death) तर १५ जण जखमी (Injured) झाले. ठार झालेल्यांमध्ये पाटील कुटुंबातील माय-लेकांचा समावेश आहे. रविवारी (ता.६) सायंकाळी अपघात (Accident) झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. पाटील कुटुंबियांवर काळाने आघात घातल्याने मुंदखेडे गावात शोककळा पसरली आहे.

मुंदखेडे बुद्रुक येथील पोपट महारु पाटील यांच्या नातवाचा नवसाचा कार्यक्रम चंदनपुरीत होता. नवसपुर्ती कार्यक्रमासाठी पाटील कुटुंबिय, भाऊबंदकी व नातेवाईक असे जवळपास २५ जण ४०७ टेम्पोने दुपारी चंदनपुरीत आले. दिवसभर देवदर्शन व धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी घराकडे परतत असताना गिगाव फाट्याजवळ मोटारसायकलस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात ४०७ टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळेस टेम्पोचा टेरिंग रॉड तुटल्याने टेम्पो गतिरोधकावर आदळून रस्त्यावर उलटली. अपघातात बन्सीलाल राघो पाटील (४५), लिलाबाई पोपट पाटील (६५), कांतीलाल पोपट पाटील (५०, तिघे रा. मुंदखेडे बुद्रुक) व आबाजी जालम पाटील (६५, मेहुटेहू, ता. पारोळा) हे चौघे जण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

परिसरातील नागरीक व रुग्णवाहिकाचालक मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना कलावती व सुविधा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चालक विजय शामराव पाटील, अनुसयाबाई पाटील, मंगला पाटील, कविता पाटील, विजय पाटील, वैष्णवी पाटील, पोपट पाटील, बळीराम पाटील, सुधीर पाटील, ऊषा पाटील, गोविंद पाटील यांचा समावेश आहे. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली होती.

गिगाव फाटा मृत्युचा सापळा

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील गिगाव फाटा मृत्युचा सापळा झाला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होतात. रविवारी झालेल्या टेम्पो अपघाताचे वृत्त समजताच मृत व जखमींच्या नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली हाेती. आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, नगरसेवक मदन गायकवाड आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यावरील गतीरोधक क्षमतेपेक्षा उंच व मोठे बनविण्यात आले आहेत. गतीरोधकाजवळ पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना गतीरोधकाचा अंदाज येत नाही. परिणामी वेगाने असलेली वाहने गतीरोधकावर आदळून अपघात होतात. भाजपतर्फे सोमवारी (ता.७) गिगाव फाट्यावर आंदोलन करण्याचा इशारा मदन गायकवाड यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.