Unseasonal Rain: उन्हाच्या झळानंतर अवकाळी पावसाचा इशारा, रब्बीसह आंबा फळपिकाला धोका
भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई : निसर्गाच्या लहरीपणा भर उन्हाळ्यामध्येही सुरुच आहे. गत आठवड्यात (Temperature) तापमानात वाढ झाल्याने राज्य होरपळून निघाले होते. उष्मघाताने अनेक दुर्घटनाही झाल्या होत्या. उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या (Maharashtra) महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. अवकाळीमुळे तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी अधिकचे नुकसान होणार आहे. (Meteorological Department) हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 4 ते 7 एप्रिलच्या दरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पाऊस बरसणार आहे. आतापर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे.
4 दिवस धोक्याचेच, कुठे आणि कसा बरसणार अवकाळी?
4 एप्रिल म्हणजेच सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर पुढील तीन दिवस कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी राहणार आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल तर दक्षिण मध्य महराष्ट्रात तुरळक ठिकाणी पण मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उन्हाच्या झळा कायम
हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी मुंबईसह राज्यात उन्हाचा तडाखा हा सुरुच आहे. अनेक शहरांचे तापमान हे 35 ते 40 अंश सेल्शिअसच्या दरम्यान आहे. राज्यातील अनेक भागात रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर संपूर्ण राज्यात हवामान हे कोरडे नोंदवण्यात आले होते.
आंबा फळपिकासाठी धोक्याची घंटा
यंदा आंबा फळपिक निसर्गाच्या लहरीपणामुळेच महिनाभर उशिराने शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. सध्या कैऱ्या अवस्थेत हे फळपिक आहे. यातच पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. याचा सर्वाधिक फटका आंबा फळपिकाला बसणार आहे. आता कुठे कैऱ्या वाढीस लागल्या होत्या. वाऱ्यामुळे आंबा गळती झाली तर ते न भरुन निघणारे नुकसान आहे. यंदा हंगाम सुरु झाल्यापासून आंबा पिकावर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे.
रब्बी पिकांची अशी घ्या काळजी
सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणा हरभरा, गव्हाची काढणी पूर्ण झाली असली तरी ज्वारी आणि उन्हाळी सोयाबीन हे वावरातच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झालेल्या ज्वारीची लागलीच मळणी करुन घ्यावी अन्यथा मोडणी केलेली कणसे ही सुरक्षित ठिकाणी साठवली तर संभाव्य नुकसान हे टळणार आहे. उन्हाळी सोयाबीनला मात्र हा पाऊस फायद्याचा आहे पण ढगाळ वातावरणामुळे यावरही कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.