शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडचणी
वर्ष २०२१-२२ या वर्षातील सर्व प्रवेशित व शिष्यवृत्तीस पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नोंदवण्यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली होती.
खामगाव : वर्ष २०२१-२२ या वर्षातील सर्व प्रवेशित व शिष्यवृत्तीस पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नोंदवण्यासाठी २८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, सर्व्हर डाऊन, जात-उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यास विलंब, तर काहींचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकाशी लिंक नसल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. यामुळे एससीला ७ मार्च, तर व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसीला अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चची मुदत दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती, इमाव, विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गातील व भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी १४ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षात उशिराने प्रवेश झाले, तर शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी १४ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाडीबीटी हे एकमेव पोर्टल अाहे. यावर अर्ज भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात फक्त महिनाभराचा कालावधी दिल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी एकाच वेळेत अर्ज भरत असल्यामुळे सर्व्हर डाऊन होऊ लागले. यावर कागदपत्रे अपलोड होईना. अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी इंटरनेटची स्पीड मिळत नसल्यामुळे अर्ज भरता येत नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही.