Take a fresh look at your lifestyle.

अलिबाग : काँग्रेस कार्यकर्त्याला विनयभंगाची खोटी तक्रार देणे पडले महागात; अद्दल घडवण्यासाठी केला होता बनाव

रेती व्यवसायाबाबत तक्रार केल्याने आरोपीने हा बनाव रचला होता

0

फेसबुकवरून महिलेशी अश्लिल चॅट करून विनयभंग केल्याची एक तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असतांना फिर्यादी महिला आणि तिचे दोन साथीदारच आरोपी ठरले आहे. कट रचून खोटी तक्रार देणं तिघांनाही महागात पडले आहे. याप्रकरणी पोलीसांनी तिघांनाही अटक केली आहे. यात एका वकीलाचाही समावेश आहे. पोलीस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अलिबागमधील उमेश मधुकर ठाकूर हे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस असून पेशाने वकील आहेत. त्यांचा रेती व्यवसायही आहे. ऍड ठाकूर यांच्या रेती व्यवसायबाबत पेण येथील काशीनाथ ठाकूर यांनी विविध कार्यालयात रेतीबाबत तक्रारी अर्ज दाखल केले असल्याने ठाकूर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. याचा राग हा ठाकूर यांच्या मनात होता. काशिनाथ ठाकूर यांना अद्दल घडविण्यासाठी ऍड ठाकूर यांनी वकिली डोके चालवून त्यांना अडकवण्याची योजना आखली. यासाठी मनीषा चोरडेकर (४३) आणि शुभम गुंजाळ (१९) या साथीदारांना हाताशी धरले.

उमेश ठाकूर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाने खोटे फेसबुक खाते तयार केले. काशीनाथ ठाकूर यांच्या नावाच्या खोट्या खात्याद्वारे मनीषा चोरडेकर याच्या फेसबुक खात्यावर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अश्लील मेसेज आणि चित्रफीत पाठविले. त्यानंतर वकिलांनी मनीषा यांना घेऊन अलिबाग पोलीस ठाण्यात काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. महिलेची तक्रार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरित करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक शैलेश सणस याना दिल्या. त्यानुसार सणस यांनी सायबर सेलची मदत घेऊन फेसबुक कंपनीशी संपर्क करून प्रथम दर्शनी शुभम गुंजाळ हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

शुभम याची सखोल चौकशी केल्यानंतर यामागे ऍड उमेश ठाकूर यांचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार ऍड उमेश ठाकूर, मनीषा चोरडेकर, शुभम गुंजाळ या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे. मनीषा आणि शुभम याना १४ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर ऍड उमेश ठाकूर हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना मेडिकल कस्टडीत ठेवण्यात आले आहे. अलिबाग पोलीस आणि सायबर सेलच्या योग्य तपासामुळे खरे आरोपी हे जाळ्यात सापडले आहेत. पोलीस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.