Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण मुंबईतील इमारती राष्ट्रध्वजाच्या तीन रंगानी उजळणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत.

0

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत. पालिकेच्यावतीने ही रोषणाई करण्यात येणार आहे. एअर इंडिया, ट्रायडंट हॉटेल, एनसीपीए या इमारतींसह मरीन ड्राइव्ह येथील इमारती तीन रंगात न्हाऊन निघणार आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार असून या अभियानांतर्गत राष्ट्ध्वजाचे घरोघरी मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत मरीन ड्राइव्ह परिसरातील इमारतीवर तिरंगी रोषणाई आणि लेझर शो देखील होणार आहे.

स्वातंत्र्यदिनी दरवर्षी मुंबईतील शासकीय इमारती तीन रंगानी सजलेल्या असतात. सीएसएमटी स्थानक, महापालिका मुख्यालय, मंत्रालय, एलआयसी अशा प्रमुख इमारतींवर ही रोषणाई असते. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक दक्षिण मुंबईत येतात. यावेळी मात्र ही रोषणाई मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मरीन ड्राइव्ह परिसरातील पुरातन आणि प्रसिद्ध इमारतींवर ही रोषणाई केली जाणार आहे. त्याकरिता पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकूण ३५ लाख राष्ट्रध्वजांसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण दहा लाख राष्ट्रध्वज मिळाले आहेत. उर्वरित सर्व साठा टप्प्याटप्प्याने येत्या तीन दिवसात मिळणार आहे. प्राप्त झालेला साठा विभाग कार्यालयांनी नोंदवलेल्या पूर्व मागणीनुसार त्या त्या प्रमाणात वितरित केला जात आहे. मुंबईकरांनी राष्ट्र ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा मान राखून आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि अभियान कालावधी संपल्यानंत राष्ट्रध्वज जपून ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.