Take a fresh look at your lifestyle.

सर्व प्रभावी खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले….

भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत.

0

मंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले असून या खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपाकडे महत्वाची खाती असल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे.  गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवत ध्वजारोहण केलं. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केलं.

शिंदे गटाकडे आणि भाजपाकडे कोणी खाती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपाच्या वाट्याला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.

फडणवीसांच्या निकटवर्तीयांना महत्त्वाची खाती
गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

शिंदे काय म्हणाले?
मंत्रीमंडळ विस्तारावरुन एकनाथ शिंदेंना ठाण्यातील मध्यरात्रीच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी, “खातं कोणतं आहे यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी मंत्र्यांवर दिलेली आहे ती नक्कीच ते यशस्वीपणे पार पाडतील. ते महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील,” असा विश्वास व्यक्त केला.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री एका विशिष्ट भागाचा नसतो असंही नमूद केलं. “एकदा मंत्री झाल्यानंतर तो मंत्री एका विशिष्ट भागाचा नसतो तर संपूर्ण राज्याचा मंत्री असतो. राज्यभरात या मंत्र्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचं आणि सर्वांगीण विकासाचं काम आम्ही करु,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.