पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करा
शेगांव :
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२१-२०२२ च्या युडायस प्रपत्रामध्ये नमुद करण्यात आलेल्या पटसंख्येनुसार शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात,परंतू मागील वर्षीच्या युडायस प्रपत्रामध्ये नमुद करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या पटसंख्येमध्ये व या वर्षीच्या विद्यार्थी पटसंख्येमध्ये वाढ झालेली आहे,त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके प्राप्त होत नाहीत,त्यामुळे विद्यार्थी व पालक नाराज होत होतात तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या सन २०२२-२०२३ च्या पटसंख्येनुसार सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी गटशिक्षणाधिकारी श्रध्दा वायदंडे यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.
याप्रसंगी नुकत्याच पंचायत समितीमध्ये रूजू झालेल्या गटशिक्षणाधिकारी श्रध्दा वायदंडे यांचे प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांमध्ये मुख्याध्यापकांनी शालेय खर्च केलेला आहे,परंतू मार्च अखेर शालेय अनुदानाची रक्कम मुख्याध्यापकांना प्राप्त झालेली होती,सदर रक्कम अदा करण्याची संगणकीय प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे व संगणकाच्या तांत्रिक समस्यामुळे सदर रक्कमेचे समायोजन झालेले आहे,तरी सदर रक्कम मुख्याध्यापकांना पुनश्च अदा करण्यात यावी अश्या शिक्षकांच्या अनेक समस्यांबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,कार्याध्यक्ष सचिन वडाळ,कार्यालयीन कर्मचारी विनोद वैतकार, जयेश गायकवाड, राहूल ससाने,विजय डाबेराव,साधना मुकवाने,संगीता लोखंडे,मिरा काळे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थी हिताच्या मागणीचे निवेदन सादर करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व उपस्थित तालुका पदाधिकारी