Take a fresh look at your lifestyle.

कोरोना आणि शिवजयंतीमुळे सगळीकडे चालू असणाऱ्या संचारबंदीचा वापर याही काळात होत होता

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे. संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने आपल्या विळख्यात अडकवले आहे. परिणामी प्रत्येक देश लॉकडाऊन करण्यात आला. म्हणजेच प्रत्येक देशामध्ये संचार बंदीचा कायदा लावण्यात आला आहे.

हा कायदा भारतात देखील लागू केला. मात्र जेव्हा भारतामध्ये संचारबंदी लावण्यात आली त्यावेळेस अनेकांच्या डोक्यामध्ये संचारबंदी हा शब्द फक्त जम्मू आणि काश्मीर याच्याशी निगडित होता. कारण जेव्हा ही संचारबंदी हा विषय निघायचा, त्यावेळेस आपल्याला जम्मू आणि काश्मीर हाच भाग आठवायचा. कारण याच भागामध्ये जास्त काळ संचारबंदी लावलेले असायची.

मात्र जम्मू आणि काश्मीरच्या अगोदरही संचारबंदी लावली जायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही संचार बंदी नक्की कुठे लावली जायची? तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हा संपूर्ण लेख वाचवा लागेल.

सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर पेशव्यांच्या हातात सत्तेची सूत्रे आली. याच दरम्यान थोरल्या बाजीरावांनी सासवड वरून पुण्यात पेशवाई आणली आणि तिथे भलामोठा शनिवारवाडा उभारला. पुढे जाऊन बाजीरावांचे सुपुत्र नानासाहेब पेशव्यांनी पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्याचा खऱ्या अर्थाने विकास केला. तिथे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या होत्या.

याच काळात पुण्याची लोकप्रियता अफाट वाढली. परिणामी संपूर्ण देशाच्या राजकारणात पुण्याचे महत्व वाढत चालले होते. देशभरातून लोक रोजगाराच्या आशेने पुण्याची वाट धरत होते. हळूहळू पुणे शहरात रूपांतरित होत होते. मात्र लोकवस्ती वाढली की तिथे भांडणे, चोऱ्यामाऱ्या या होतच रहातात. याच पद्धतीने पेशवाईत ही असच घडू लागले होते. पुण्याची लोकसंख्या वाढली आणि तिथे छोट्या मोठ्या चोऱ्या, जमिनीचे तंटे, मारामारी यांचेही प्रमाण वाढू लागले होते.

या सगळ्याला वचक बसवण्यासाठी आणि पुण्याचा कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी कोतवाल हे पद निर्माण करून त्या पदी जिवाजीपंत खाजगीवाले यांची नेमणूक केली. तर १७६४ साली श्रीमंत माधवरावांनी स्वतंत्र पोलीस खाते निर्माण करून, पुण्याच्या सुव्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला होता.

कोतवालाच्या नेमणुकीपासून ते पोलीस खात्या पर्यंत सगळीकडे देखरेख करण्याची जबाबदारी ही श्रीमंत माधवरावांनी नाना फडणवीस यांच्याकडे सोपवली होती.

यावेळी कोतवाल हा पोलीस खात्याचा प्रमुख बनला होता. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चोऱ्या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे. त्याच बरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऐवजांची नोंदणी अशी कितीतरी कामे या काळी कोतवाल करत असे.

पुढे जाऊन १८ फेब्रुवारी १७६४ रोजी पुण्याचा पहिला कोतवाल म्हणुन बाळाजी नारायण केतकर याची निवड झाली. आणि १७६८ साली कोतवालाला बुधवार पेठेत बांधीव मुख्यचावडी उघडुन देण्यात आली. सोबतच त्यांच्या हाताखाली १२४ जणांचा ताफा दिली. ही शिबंदी घोड्यावरून पुणेशहरभर चक्कर मारून बंदोबस्त ठेवत होती. याचबरोबर कोतवालासह त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचे एक विशिष्ट किंमतीचे पगारही ठरवले गेले होते.

बाळाजी केतकर पुण्याचे कोतवाल झाल्या झाल्याच रात्रीच्या अंधारात होणारे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रात्री नऊ ते पहाटे चारपर्यंत पुणे शहरात संचारबंदी आणि प्रवेशबंदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.

 

या संचार बंदीच्या काळात पुण्यात कडक देखरेख ठेवली जात होती. दररोज रात्री नऊ वाजता तोफेचा बार उडवून संचार बंदी सुरू तर पहाटे ४ वाजताच्या तोफेनंतर संचार बंदी समाप्त होत असे.

तर अशा पद्धतीने आपण समजत असलेल्या जम्मू-काश्मीर किंवा संपूर्ण देशातली संचारबंदीत ही पेशवाईच्या काळापासून चालत आलेली आहे.

-निवास उद्धव गायकवाड

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.