आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके ठरले देवदुत
तालुक्यातील ४५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण
शेगांव :
देव कधीच कुणाला भेटला नाही,भेटेल की नाही हे सुध्दा कोणालाच माहित नाही,पण देवासारखा देवमाणूस ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांच्या माध्यमातून भेटलेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम व हलाखीची असल्यामुळे प्रज्ञावंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पुर्ण करू शकत नाहीत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्याना परिक्षेस बसण्यास प्रवृत्त करून तालुकास्तरावर,केंद्रस्तरावर शिक्षकांच्या कार्यशाळा घेणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सराव वर्ग घेणे, सातत्याने प्रश्नसंच सोडवून घेणे व राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन करण्यासाठी प्रश्न पत्रिका सोडविण्याबाबतची सोपी पध्दती आदी विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करणे तसेच तालुक्यातील शाळा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीच्या विषयाचे सखोल अध्यापन शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके दरवर्षी करत असल्यामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकुन शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक तळमळीमुळे सन २०२२-२०२३ या परिक्षेचा नुकत्याच लागलेल्या निकालानुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जि.प.शाळा तरोडा-डी ३ ,जि.प.विद्यालय जवळा बु. १०,जि. प.शाळा भास्तन (जुने) ०२,जि.प.शाळा लासुरा १,जि.प.शाळा तिंत्रव ०३,जि.प.विद्यालय माटरगाव ४ ,जि. प. शाळा गव्हाण ०७ , जि.प.शाळा सगोडा ११,जि.प.शाळा डोलारखेड ०२ ,जि.प.शाळा कठोरा १ विद्यार्थी असे तालुक्यातील एकूण ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असुन या विद्यार्थ्यामधून गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते इयत्ता बारावी पर्यत प्रतिवर्ष बारा हजार रूपये याप्रमाणे चार वर्षात अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थी गटविकास अधिकारी सतिष देशमुख,गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे,शिक्षण विस्तार अधिकारी गजानन गायकवाड,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना देत आहेत.