मी तर परीक्षा रद्द करणारा मंत्री – उदय सामंत
परीक्षा रद्द करणारा मंत्री, अशी माझी राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये ख्याती झाली आहे, अशी टिपणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिंचवड येथे बोलताना केली.
मुंबई : परीक्षा रद्द करणारा मंत्री, अशी माझी राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये ख्याती झाली आहे, अशी टिपणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चिंचवड येथे बोलताना केली. खासदार श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमास मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार श्रीरंग बारणे, त्यांच्या पत्नी सरिता बारणे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मी जातो. तिथे मला उच्च शिक्षणमंत्री म्हणून ओळखत नाहीत. तर, परीक्षा रद्द करणारा मंत्री आला म्हणून ओळखतात. परीक्षा न घेता परीक्षेत उत्तीर्ण करणारा मंत्री, अशी माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. अशी भावना राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये झाली आहे. त्या भावनेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढले पाहिजे.
पिंपरी पालिकेच्या निवडणुकीनंतर शहराचा महापौर ठरवण्यासाठी शिवसेनेची तसेच खासदार बारणे यांची भूमिका निर्णायक असेल, असा दावा उदय सामंत यांनी या वेळी केला. तर, बारणे यांनी केवळ मावळ लोकसभेपुरते मर्यादित न राहता यापुढे त्यांच्या कामाची व नेतृत्वाची व्याप्ती राज्यस्तरापर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी व्यक्त केली.