Take a fresh look at your lifestyle.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘कोकण मराठी चित्रपट महोत्सव’ २ मेपासून

या संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात कोकणात जास्तीत जास्त चित्रपट येतील. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत

0

सावंतवाडी  : कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या दि. २ ते ७ मे या कालावधी पहिल्यांदाच सिंधुरत्न संस्थेच्या माध्यमातून ‘कोकण मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील लोकेशन आणि स्थानिक कलाकारांसह पर्यटनाला त्याचा फायदा होईल त्यामुळे रोजगार निर्माण होईल असा उद्देश आहे, अशी माहिती विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी दिली.

या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक दहा वेगवेगळे चित्रपट मोफत दाखवले जाणार असून दोन तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ आणि समारोप करण्यात येणार आहे. याचा फायदा स्थानिक कलाकारांना होईल, असेही ते म्हणाले.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अमोल चौगुले, अवि सामंत, विजय राणे, यश सुर्वे, हार्दिक शिगले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.

श्री.पाटकर म्हणाले, कोकणही पर्यटनासह कला रत्नांची खाण आहे. चित्रपट सृष्टी ५५ टक्के कलाकार हे कोकणातील आहेत. मात्र हे कोकणवासीयांना माहीत नाही. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोकणातील कलाकारांची ओळख करून दिली जाणार आहे. तर स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात प्राधान्याने आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील कलाकारांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील कलाकारांना घेऊन सिंधुरत्न ही संस्था आम्ही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात कोकणात जास्तीत जास्त चित्रपट येतील. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून या ठिकाणी चित्रीकरण झाल्यास येथील पर्यटन जगाला कळेल. तसेच येथील स्थानिक कलाकारांना संधी मिळेल. आणि रोजगारही उपलब्ध होईल, हा आमच्या संस्थेचा मानस आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गरम्य परिसर, समुद्र किनारा लाभला आहे. तसेच रेल्वे, रस्ता, विमानतळ अशी दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत त्यामुळे चित्रपट निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, चित्रपट निर्मिती पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी कोकण मराठी चित्रपट महोत्सव उपयुक्त ठरेल, असे विजय पाटकर म्हणाले. या चित्रपट महोत्सवात दि.६ मे रोजी सेमिनार सुरू होईल. चित्रपट महोत्सव व्यवसाय करणाऱ्यांना विचारांची देवाणघेवाण करता येईल. कोकणात शुटिंग झालेल्या फिल्म दाखविण्यात येतील. एक चित्रपट निर्मिती झाली तर सुमारे ४०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा समोर आणण्याचा प्रय आहे असे विजय पाटकर यांनी सांगितले. विजय राणे म्हणाले, चित्रपट निर्मिती पोषक वातावरण निर्माण करताना पर्यटन विकास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०१९ ते २०२१ या कालावधीतील मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल. जिल्ह्यात दहा फिल्म नामांकित करून प्रत्येक तालुक्यात व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.