गैबिनंद घुगे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरावर सदर नवोपक्रमास प्रथम क्रमांक प्राप्त
सिंदखेड राजा :
महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषदेद्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२०२२ चा बुलढाणा जिल्ह्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावखेड तेजन पंचायत समिती सिंदखेड राजा येथे कार्यरत असलेले सहाय्यक अध्यापक गैबिनंद घुगे यांनी सादर केलेल्या ” क्यू आर कोडच्या संगतीने , अभ्यास करू गमतीने “ या नवोपक्रमास जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झालेला असून सदर नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थी प्रगत व्हावेत यासाठी हा उपक्रम विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक ठरलेला आहे. गैबिनंद घुगे यांनी स्वतः इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शालेय विषयाचे व्हिडिओची निर्मिती केलेली असून त्यापैकी इयत्ता दुसरी च्या मराठी व गणित विषयाच्या व्हिडिओचे क्युआर कोड तयार करून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत, याचा फायदा कोरोना काळात विद्यार्थ्यांना भाषा व गणिताचे कौशल्य प्राप्तीसाठी झालेला आहे.विद्यार्थी कोरोना काळात सुद्धा लिहू वाचू लागले.गतवर्षीही गैबिनंद घुगे यांच्या उपक्रमास जिल्ह्यास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता ही विशेष बाब आहे. राज्यात व जिल्ह्यास सदर नवोपक्रमाचे लेखन व निर्मिती करून नावलौकिक प्राप्त करून दिल्यामुळे त्यांच्यावर सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.