५००० रुग्णांना ओमिक्रॉन संसर्ग
राज्यात जनुकीय तपासणी केलेल्यांपैकी ५००० रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग
पुणे : राज्यात जनुकीय तपासणी केलेल्यांपैकी ५४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचे निदान प्रयोगशाळांमधून करण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पाच हजार रुग्णांना ओमिक्रॉन झाल्याचेही सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
राज्यात आतापर्यंत नऊ हजार ३८२ रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले. त्यात पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस), बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश होता. राज्यातील अशा वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून तपासलेल्या नमुन्यांपैकी आठ हजार ७१४ नमुन्यांचे अहवाल राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आतापर्यंत मिळाले आहेत. त्यापैकी पाच हजार पाच रुग्णांना (५४ टक्के) कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आली.
राज्यातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांकडे ६६७ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात ओमिक्रॉनचे २३४ नवीन रुग्ण गुरुवारी आढळले. हे सर्व रुग्ण मुंबईमध्ये आहेत. हे सर्व अहवाल कस्तुरबा हॉस्पिटल प्रयोगशाळेने दिले आहेत.