IPL 2022 : दाक्षिणात्य संघांमध्ये आज झुंज; चेन्नई-हैदराबाद आमने-सामने
IPL 2022 : चेन्नई सुपरकिंग्ज - सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये लढत
IPL 2022 : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये दोन दाक्षिणात्य संघांमध्ये लढत रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज – सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये लढत पार पडेल. यावेळी एकीकडे चेन्नई सुपरकिंग्जचा संघ सलग तीन पराभवांनंतर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील, तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी जीवाचे रान करील.
२०२१ मध्ये आयपीएल विजेता ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंना अद्याप सूर गवसलेला नाही. ॠतुराज गायकवाडला पहिल्या तीन लढतींत छान कामगिरी करता आलेली नाही. मोईन अली, रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू यांचीही तीच परिस्थिती आहे. रॉबिन उथप्पाच्या फलंदाजीतही सातत्य असायला हवे. महेंद्रसिंग धोनी व शिवम दुबे यांनी मात्र चांगली फलंदाजी केली आहे. कर्णधार जडेजाला दीपक चहरची अनुपस्थिती या मोसमात प्रकर्षाने जाणवते आहे. त्यांच्याकडे ड्वेन ब्राव्होच्या रुपात अनुभवी गोलंदाज आहे.
सांघिक कामगिरीत यश मिळवावे लागेल
पहिल्या दोन लढतींत पराभूत होणाऱ्या सनरायझर्स हैदराबादमधील खेळाडूंना सांघिक कामगिरीत यश मिळवण्याची गरज आहे. कर्णधार केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम यांच्याकडून फलंदाजीत अपेक्षा आहेत. भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, रोमारियो शेफर्ड यांना चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांना रोखावे लागेल.
चेन्नई सुपरकिंग्ज – सनरायझर्स हैदराबाद
डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
दुपारी ३.३० वाजल्यापासून