Take a fresh look at your lifestyle.

सांगलीत नवे राजकीय समीकरण ? ; जयंत पाटील आणि सदाभाऊंची जवळीक

विधानसभा निवडणुकीवेळी सर्व विरोधक एकत्र येणार नाहीत, याची दक्षता जयंत पाटील सातत्याने घेत आले आहेत.

0

सांगली : भाजपच्या मांडवाखाली रयत क्रांती संघटनेच्या  माध्यमातून आपली वेगळी चूल मांडणारे माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी वाढती जवळीक इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. शहरातील जलनिस्सारण कामाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार खोत जयंत पाटलांच्या शेजारी बसले होते. दुसऱ्या बाजूला एकेकाळी शेतकरी चळवळीतील सर्जा-राजा अशी ओळख असलेल्या जोडीतील राजू शेट्टी आघाडी सरकारविरुद्ध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.  वाळवा मतदारसंघातील इस्लामपूर नगरपालिका राजकीय चळवळीतील महत्त्वाचे केंद्र. येथील नगरपालिकेवर जयंत पाटील यांची तीन दशकांहून अधिक काळ सत्ता होती. मात्र, राज्यात भाजपने सत्ता हाती घेतल्यानंतर इस्लामपूरमध्ये सत्ता बदल करून दाखवायचाच या ईर्षेने जयंतविरोधकांना एकत्र करण्यात आमदार खोत यांनी पुढाकार घेतला होता. विकास आघाडीच्या माध्यमातून थेट नगराध्यक्ष निवडीत बाजी मारत असताना नगरसेवकांच्या संख्येचीही बरोबरी करण्यात विरोधकांना यश आले. यासाठी भाजपबरोबरच, काँग्रेस, शिवसेना यांना सोबत घेण्यात आले. नानासाहेब महाडिक, राजू शेट्टी यांनाही एकाच व्यासपीठावर यावे लागले. यामुळे जयंत पाटील यांच्या दीर्घकाळच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला होता.

आता मात्र, राज्यात सत्ताबदल होत असताना अनेक राजकीय समीकरणे बदलत आहेत. जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्यानेही पक्षविस्तार करण्यातही आघाडीवर आहेत. कामाचा व्याप असतानाही इस्लामपूर शहरातील अगदी लहान-लहान घटनाकडेही त्यांचे लक्ष असते. आता तर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी केली असावी असे वाटते.  यापूर्वी त्यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घेतले होते.

वाळवा व शिराळा तालुका हातकणंगले मतदारसंघात समाविष्ट असल्याने शेट्टी यांचा या ठिकाणी थेट संपर्क गेल्या दोन दशकांपासून आहे. याच भागातून त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले  आहे. भाजपशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी दोन्ही काँग्रेसशी घरोबा केला. ज्या साखरसम्राटांशी संघर्ष केला त्यांच्याच पंगतीला बसल्याने मतदारांनीही शेट्टींना बाजूला केले. राष्ट्रवादीशी त्यांची झालेली सोयरीक ऊसपट्टयातील मतदारांनी नाकारली. यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले.

एकरकमी एफआरपीवरून साखर कारखानदारांना कोंडीत पकडण्याचे  शेट्टी यांचे प्रयत्न होते. मात्र, राज्य सरकारने दोन हप्तय़ांत उसाची देयके देण्यास मान्यता दिल्याने हाही त्यांचा हेतू  अयशस्वी ठरला. आता वीज प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेले आठ दिवस त्यांचे धरणे आंदोलन सुरू असताना शासकीय पातळीवरून या आंदोलनाला महत्त्वच दिले नसल्याने स्वाभिमानीला आंदोलनजीवी ठरविण्याचे प्रयत्न सत्ताधारी आघाडीचे दिसत आहेत.  भाजपनेही त्यांना महत्त्व देण्याचे टाळले असल्याने शेट्टीची कोंडी झाली आहे.  याच संघटनेतून राजकीय महत्त्व  प्राप्त झालेले सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या मांडवात राहून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. रयत क्रांती संघटनेचा स्वतंत्र झेंडाही हाती घेतला. राज्यमंत्री असताना इस्लामपूर नगरपालिकेत सत्तांतर घडविण्यात त्यांचा पुढाकार होता. मात्र, सत्ता हाती येताच विकास आघाडीतील सहभागी असलेल्यांनी आपआपले राजकीय ईप्सित साध्य करण्यात पुढाकार घेतल्याने खोत यांचे महत्त्व वाटेनासे झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नगराध्यक्ष पद मिळवले, मात्र, शहरातील विकासकामे करीत असताना संख्याबळावर वरचढ  ठरलेल्या राष्ट्रवादीने खोडा घालण्याचे काम सातत्याने केले. राज्यातील सत्ता बदलाचा सर्वाधिक त्रास निशिकांत पाटील यांना होत आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात तेच उमेदवार राहतील असे गृहीत धरूनच वाटचाल सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी सर्व विरोधक एकत्र येणार नाहीत, याची दक्षता जयंत पाटील सातत्याने घेत आले आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी याची प्रचीती आली. निशिकांत पाटील यांची युतीतील बंडखोरी त्यांच्या पथ्यावर कशी पडेल याची दक्षता सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेच्या गौरव नायकवडी यांच्या उमेदवारीवरून दिसून आली. तेव्हापासून खोत हे विकास आघाडीपासून अंतर राखूनच राहिले आहेत. आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची जयंत पाटलांसोबत वाढलेली जवळीक भाजपच्या नेत्यांना रुचेलच असे नाही.

मोर्चेबांधणी

मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी केली असावी असे वाटते.  यापूर्वी त्यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घेतले होते. परंतु, आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खोत यांची जयंत पाटलाशी वाढलेली जवळीक भाजपच्या नेत्यांना रुचेलच असे नाही

Leave A Reply

Your email address will not be published.