Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा चाचणीदरम्यान मृत्यू

Aurangabad Agnivir Suddenly Youth Dies Unning In Recruitment Process

0

औरंगाबाद : घरची गरिबीची परिस्थिती. आईचे आजारपणाने निधन झालेले. अशातही देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगत घरची परिस्थिती सुधारण्याची इच्छा असलेल्या तरुणाचा अग्निवीर सैन्य भरतीपूर्व परीक्षेत धावताना अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १८ ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानावर घडली. करण नामदेव पवार (वय २० वर्षे, रा. सिरजापूर-विठ्ठलवाडी, पोस्ट चापानेर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली.

बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण आणि त्याचा भाऊ सागर पवार (१८) हे दोघे गावातील इतर मुलांसोबत औरंगाबादेत वाहनाने सैन्य भरतीसाठी १७ ऑगस्टरोजी आले होते. सध्या विद्यापीठ परिसरातील मैदानावर अग्निवीर योजनेंतर्गत सैन्य भरती प्रक्रिया सुरू आहे. १८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास भरती प्रक्रिया सुरू असताना सोळाशे मीटर धावण्यासाठी काही गट करण्यात आले. एका गटामध्ये करण होता तर दुसऱ्या गटामध्ये त्याचा लहान भाऊ सागर होता. रात्री दीड ते दोनदरम्यान करणचा धावण्याचा राऊंड सुरू झाला. करणने धावण्याचे तीन राऊंड पूर्ण केले, चौथ्या राऊंडला मात्र तो चक्कर येऊन कोसळला आणि बेशुद्ध झाला. बेशुद्धावस्थेत करणला तत्काळ सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनातून घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करणला मृत घोषित केले. तपास बेगमपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल बोडखे करत आहेत.

चार वर्षांपासून करत होता तयारी

करण हा मागील तीन ते चार वर्षांपासून तो सैन्य भरतीची तयारी करत होता. सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. त्यासाठी मोठा भाऊ तयारी करताना पाहून त्याचा लहान भाऊ सागर हाही सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पाहू लागला. दोघे भाऊ मिळून सोबतच सैन्य भरतीची तयार करत होते. मात्र, अचानक भाऊ सोडून गेल्याचे दुःख सागरला अनावर झाले होते.

करण आणि सागर हे आजी-आजोबांसोबत राहत होते. सागर हा कन्नड येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम वर्षात शिकतो. त्याच्या आईचे २०१४ मध्ये आजारपणामुळे निधन झालेले आहे. धावताना आपला भाऊ कोसळला आणि त्याला सैन्य दलाच्या वाहनात दवाखान्यात नेताना सागरला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर आपला भाऊ सोडून गेल्याचे कळताच सागरच्या अश्रूंचा बांध फुटला होता. दरम्यान, करण पवार यांच्यावर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास चापानेर परिसरातील विठ्ठलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.