‘असनी’ चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागराला बसणार फटका?
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात 'असनी चक्रीवादळ' (Asani Cyclone) घोंघावू शकतं.
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात ‘असनी चक्रीवादळ’ (Asani Cyclone) घोंघावू शकतं. हवामान विभागानं (IMD) म्हटलंय की, नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचं क्षेत्र पुढील आठवड्याच्या सुरुवातीला चक्री वादळात बदलू शकतं. हे चक्रीवादळ नंतर बांगलादेश आणि लगतच्या उत्तर म्यानमारकडं सरकणार आहे. सध्या कमी दाबाचं क्षेत्र (LPA) मंगळवारी तयार झालं असून शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडं (Andaman and Nicobar Islands) जाईल, असं IMD नं नमूद केलंय.
हवामान खात्यानं (Meteorological Department) सांगितलं की, सध्या तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र 21 मार्च रोजी चक्री वादळात बदलण्याची दाट शक्यता आहे, तर 22 मार्च रोजी हे वादळ उत्तर आणि ईशान्येकडं सरकेल. जर या चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं, तर त्याचं नाव ‘असनी’ असेल. नियमांनुसार, या चक्री वादळाला श्रीलंकेनं ‘असनी’ असं नाव दिलंय. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ 23 मार्च रोजी बांगलादेश (Bangladesh) आणि म्यानमारच्या (Myanmar) उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचेल.
हवामान खात्यानुसार, गुरुवार आणि शुक्रवारी आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय. येत्या बुधवारी बंगालचा दक्षिणेकडील भाग आणि अंदमान समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. शनिवार ते मंगळवार दरम्यान अंदमान समुद्रातून अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही हवामान खात्यानं दिलाय. तसेच रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर असू शकतो, तर दुसऱ्या दिवशी ताशी 90 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, चक्रीवादळाचं वादळात रुपांतर झाल्यास ते किती धोकादायक ठरू शकतं, हे हवामान खात्यानं सांगितलेलं नाहीय.