“माझी शिवभक्तांना एकच विनंती आहे…”, शिवजयंतीच्या निमित्ताने संभाजीराजे भोसलेंचं आवाहन!
संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांना आवाहन केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात शिवभक्त मंडळी सोहळा साजरा करण्यात मग्न झाली आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवजयंतीनिमित्ताने प्रत्यक्ष वा ट्विटरवर शुभेच्छा देताना शिवरायांना मानवंदना दिली आहे. भोसले घराण्याचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराजांच्या नावानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतानाच कळकळीचं आवाहन केलं आहे.
“नुसता जयजयकार करून चालणार नाही”
“शिवाजी महाराज हे सर्वंसाठी आदर्श आहेत. असा जगात कुठलाच राजा झाला नाही की ३०० वर्षांनंतरही lrच प्रेरणा शिवभक्त घेऊन जातात. माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचं आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघावं असं माझं सगळ्या युवकांना आवाहन आहे”, असं संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.
दरम्यान, आज सकाळी शिवनेरीवर दरवर्षीप्रमाणे शिवजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.