Take a fresh look at your lifestyle.

फ्रेशर्स पार्टी पडली महागात… मेडिकल कॉलेजमधील १८२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह, ३००० कर्मचाऱ्यांच्या करणार चाचण्या

दोन्ही डोस घेतलेल्या करोना बाधितांची संख्याही अधिक, जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून नवीन व्हेरिएंटची चाचपणी करण्याचा निर्णय

0

कर्नाटकमधील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये करोना संसर्गामुळे हाहाकार उढाला आहे. येथील १८२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी हा आकडा केवळ ६६ इतका होता. करोनाबाधितांची संख्या आणखीन वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय. धक्कादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी करोना लसींची दोन्ही डोस घेतले होते. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फेशर्स पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं. या पार्टीनंतरच करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

या मेडिकल कॉलेजमध्ये एकूण ४०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १८२ विद्यार्थींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही. धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार ६६ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असून आज उर्वरित १०० जणांची चाचणी केली जाणार आहे. या कॉलेजशी संबंधित कर्मचाऱ्यांच्याही करोना चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या संसर्ग झालेल्यांना विलगीकरणामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

आरोग्य अधिक्षक असणाऱ्या डी. रणदीप यांनी करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या चाचण्यांनंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठीही हे नमुने पाठवण्यात येणार आहेत. करोना संसर्गाचा हा विस्फोट एखाद्या नवीन करोना व्हेरिएंटमुळे झालेला नाही ना?, हे तपासून पाहण्यासाठी या चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

हुबळी-धारवाडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, यशवंत यांनी “संसर्ग झालेल्यांपैकी अनेकांना करोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस मिळाले होते. सध्या या सर्वांना हॉस्टेलमध्येच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती दिली. या संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्याच्या आरोग्य विभागामने या कॉलेज आणि कॉलेजशी संबंधित रुग्णालयामधील जवळजवळ तीन हजार कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत एक हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी अनेकांच्या चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत. कर्नाटकमध्ये आतापर्यंत २९ लाख ९४ हजार ५६१ करोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३८ हजार १८७ इतकी आहे.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.