Take a fresh look at your lifestyle.

प्रियांका गांधींना ओढत, फरफटत घेतलं ताब्यात, काँग्रेसच्या बेरोजगारी, महागाई विरोधातील आंदोलनावर पोलिसांची कारवाई

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे.

0

काँग्रेसकडून महागाई, बेरोजगारी विरोधात आंदोलनात करण्यात येत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींपासून खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींपर्यंत सर्वच नेते रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अशातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावरील पोलीस कारवाईनंतर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

कारवाईच्या व्हिडीओत पोलीस प्रियांका गांधी यांना जबरदस्तीने उचलून पोलीस गाडीत नेत आहेत. यावेळी महिला पोलिसांनी प्रियांका गांधींचे हात-पाय धरून गाडीत बसवलं. यावेळी प्रियांका गांधी आंदोलनावर ठाम असल्याने पोलिसांनी हातपाय ओढत आणि अगदी फरफटत ताब्यात घेतलं.

राहुल गांधीची केंद्र सरकारवर टीका

“विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटं बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत” असल्याची टीका राहूल गांधींनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रातही आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नाना पटोलेंचे हातपाय पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. काँग्रेसने ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यानुसार, पोलिसांनी विधानभवन परिसरातून काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेतल्याचं नमूद करण्यात आलं.

बीडमध्येही काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. देशात वाढलेली महागाई जीएसटी आणि अग्निपथ योजना रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून देशामध्ये महागाई वाढली आहे. बेरोजगारीचा आकडा देखील वाढतोय. त्यामुळे सरकारने तात्काळ महागाई आणि जीएसटी कमी करा, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.