Take a fresh look at your lifestyle.

बैलांच्या संख्येत सुमारे ५० टक्क्यांनी घट!; पोळय़ाच्या दिवशी मातीच्या बैलाचीच पूजा ; ट्रॅक्टरची संख्या वाढली

पोळय़ाच्या दिवशी शहरी भागात पूजेसाठी मातीचे बैल वाढले आणि ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या बैलाच्या संख्येकडे सरकू लागली आहे.

0

औरंगाबाद: पोळय़ाच्या दिवशी शहरी भागात पूजेसाठी मातीचे बैल वाढले आणि ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या बैलाच्या संख्येकडे सरकू लागली आहे. शेतीचे आकारमान कमी होत असताना राज्यातील ट्रॅक्टरची संख्या आठ लाख ५० हजार एवढी आहे, तर बैलांची संख्या ३९ लाख ८४ हजार एवढी आहे. २०१२ ते २०१९ या कालावधीत बैलांची संख्या ३२ टक्क्यांनी कमी झाली होती ती आता सुमारे ५० टक्क्य़ांपर्यंत गेली असावी असा अंदाज आहे. ग्रामीण भागात दारासमोर ट्रॅक्टर उभे करण्यात निर्माण झालेल्या प्रतिष्ठेमुळे सध्या बैलापेक्षा ट्रॅक्टरची संख्या लक्षणीय वाढत असून येत्या पाच वर्षांच्या काळात देशात प्रतिवर्षी सहा ते सात लाख होणाऱ्या ट्रॅक्टर विक्रीत २०२७ पर्यंत ८.९ टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या बायफ या संस्थेच्या राजश्री जोशी म्हणाल्या,की महाराष्ट्र, पंजाबसारख्या सधन राज्यात ट्रॅक्टरची संख्या वाढते आहे. पण दक्षिण गुजरात सारख्या भागात जिथे सारा शेतीचा कारभार महिलांच्या हातात आहे, अशा ठिकाणी अजूनही तंत्रज्ञान फारसे पुढे सरकलेले नाही. पण पशुपालन आणि कृषीमध्ये मजुरांची कमतरता यामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढत आहे. त्यात चूक आहे असे नाही. उलट महिलांना चालिवता येतील असे ट्रॅक्टर तयार व्हायला हवेत. तसे ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षणही ‘बायफ’ संस्थेकडून देण्यात आली आहेत. या संस्थेचे  रावसाहेब कोटेजी म्हणाले, आता बैल आणि ट्रॅक्टरची संख्या अगदी अर्धी- अर्धी असू शकेल. याचा अर्थ बैलांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

दुसरीकडे शहरी भागात मातीच्या बैल मूर्तीचा बाजार मोठा तेजीत आहे. एक बैलजोडी मूर्तीची किंमत १५० रुपये. बैलजोडी देखणी असेल तर त्यात पुन्हा वाढ. ग्रामीण भागात बैलांचे बाजारही आता घटले आहेत. पण शंकरपटासाठीच्या बैलाच्या किंमती कमालीच्या आहेत. सर्वसाधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत चांगली बैलजोडी येते. चारा पिके कमी होणे, पशुपालनासाठी मनुष्यबळाची कमतरता यामुळे दुधाळ जनावरे एकवेळ सांभाळली जातात, पण बैल सांभाळण्याचे प्रमाण कमालीचे घटलेले आहे.

  •   १९ वी पशुगणना २०१२ मध्ये घेण्यात आली होती. तेव्हा बैलांची संख्या ५३ लाख २३ हजार एवढी होती. २० वी पशुगणना २०१९ मध्ये झाली तेव्हा बैलांची संख्या ३९ लाख ८४ हजारांनी घटले. ही घसरण ३२ टक्क्यांची होती.
  •   कृषिप्रधान देशात ट्रॅक्टरच्या कर्जासाठी आकारला जाणारा व्याजाचा दर १०.५० टक्के एवढा आहे.  तरीही राज्यात सरासरी प्रतिमाह सात ते साडेसात हजार ट्रॅक्टर विक्री होते.

Leave A Reply

Your email address will not be published.