ठाकरे सरकार कोसळणार?; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत, म्हणाले, “राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा…
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलंय.
एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहचल्यानंतर जाहीर केलं होतं. त्यानंतरपासूनच राज्यामधील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच आता संजय राऊत यांनी विदानसभा बरखास्तीसंदर्भात ट्विट केलं आहे.
दरम्यान आज सकाळीच प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचंच कार्य केलं आहे. त्यांच्याशिवायी आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील,” असं सांगितलं.
“शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे”
भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपाला जर ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं वाटत असेल तर शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. याआधी अनेकदा शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे. हा गेल्या ५६ वर्षांचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, सहकारी हे अत्यंत जीवाभावाचे असून सकारात्मक चर्चा सुरु आहे”.
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं होतं त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना असे पाठीमागून वार करत नाही. काल आणि आज सकाळीदेखील शरद पवारांशी माझी चर्चा झाली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे”.