“तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज…”, संजय राऊतांनी शिवजयंतीच्या निमित्ताने साधला केंद्रावर निशाणा!
संजय राऊतांनी शिवजयंतीच्या निमित्ताने केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातलं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी उडी घेत संजय राऊतांवर साधलेल्या निशाण्याचीही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीच्या निमित्ताने संजय राऊतांनी केंद्र सरकारवर आणि पर्यायाने भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “दिल्लीनं इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत”, असं राऊत म्हणाले आहेत.
“दिल्लीसमोर झुकणार नाही…”
यावेळी संजय राऊतांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण देताना आपण दिल्लीसमोर झुकणार नसल्याचं प्रतिपादन केलं आहे. “छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, ती म्हणजे स्वाभिमान. मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही हा जो बाणा शिवरायांचा आहे, तो महाराष्ट्रानं कायम जपला. आजही आम्ही दिल्लीसमोर ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत. दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.