जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शेगाव येथे कर्मचा-यांची घोषणाबाजी व निदर्शने
शेगांव :
राज्यातील १७ लाख शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक १४ मार्च २०२३ पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर गेलेले असुन संपाच्या तिस-या दिवशी कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीच्या घोषणा देऊन जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या अभ्यासगट समितीच्या आदेशाची होळी करण्यात आली.
भविष्यातील सुरक्षेची हमी असलेल्या “जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करा” या मागणीकरिता राज्यव्यापी संप पुकारण्यात आलेला असुन देशातील राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे त्याप्रमाणे औद्योगिक प्रगती असलेले व पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्यात देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणीसाठी समन्वय समितीने केली आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी प्रहार शिक्षक संघटना,ग्रामसेवक संघटना,लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना,आरोग्य विभाग कर्मचारी संघटना,महसूल विभाग कर्मचारी संघटना,शिक्षक सेना,कास्ट्राईब शिक्षक संघटना,उर्दू शिक्षक संघटना,जुनी पेन्शन हक्क संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना तसेच तालुका समन्वय समिती या आदी विविध संघटनेच्यावतीने पंचायत समितीच्या प्रांगणात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात घोषणाबाजी करून निदर्शने केली.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,तालुकाध्यक्ष सुनिल घावट,संजय सुरडकर,समन्वय समितीचे पदाधिकारी प्रमोद इंगळे,अंनतराव वानखडे,प्रविण कात्रे,नवल पहुरकर, शकील अहमद यांच्यासह बहुसंख्येने शिक्षक,शिक्षिका व शासकीय, निमशासकीय शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.