IPL 2022: चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर रैनाचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय; म्हणाला, “आता कुठे आयपीएलमध्ये…”
यंदा चेन्नईच्या संघाने रैनाला संघात स्थान दिलेलं नाही त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाहीय.
आयपीएल २०२२ चा २९ वा सामना अगदी अटीतटीचा झाला. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जवर गुजरात टायटन्सने तीन गडी राखून विजय मिळवला. रविवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात ‘किलर मिलर’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डेव्हिड मिलरच्या नाबाद ९४ धावांच्या तुफानी खेळीमुळे गुजरात संघाने चेन्नईच्या तोंडून सामना अगदी ऐनवेळी हिसकावून घेतला. विशेष म्हणजे गुजरातच्या या विजयानंतर पूर्वी चेन्नईकडून खेळणारा आणि यंदा कोणीच बोली न लावल्याने संघाबाहेर राहिलेल्या सुरेश रैनानं केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम आतापर्यंत त्यांच्या नावाला साजेसा ठरलेला नाही. आयपीएल २०२२ मध्ये सीएसकेने आतापर्यंत पाच सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा असल्याचं सांगितलं जातंय. गुजरातविरुद्धच्या पराभवामध्ये चेन्नईच्या संघाने ऐनवेळी कच खाल्ल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे या सामन्यानंतर रैनाने केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर रैनाने हे ट्विट केलंय हे विशेष.
“काय भन्नाट सामना झालाय. आयपीएलमध्ये आता कुठे अशा अटीतटीच्या सामन्यांमुळे जीव आलाय. राशिद खानचं कर्णधार म्हणून पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन आणि मिलरने तर चेंडू मैदानाच्या सर्व भागांमध्ये टोलवलाय,” असं रैना म्हणालाय.
What a match. IPL has come alive with this close encounter. Congratulations to Rashid on debut as a captain, and Miller sent the ball all over the park.#CSKvsGT
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) April 17, 2022
चेन्नई सुपर किंग्जच्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन्सने १६ धावांत तीन विकेट गमावल्या. मात्र डेव्हिड मिलरने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रशीद खानने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची तुफानी भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला.