जि.प.शाळा कठोरा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
शेगांव :
पोळा हा मोठ्या माणसांचा सण लहान मुलांनाही साजरा करावासा वाटला तरी त्यांना तो साजरा करता येत नाही, कारण मोठ्या आकाराचे व वजनाचे बैल हाकारणे चिमुकल्यांना शक्य होत नाही म्हणून खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे.
जि.प.शाळा कठोरा येथे ही परंपरा जोपासत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी बैलाचे आणि शेती व्यवसयाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला.

लहान मुलांनी सृजनशीलता जोपासत पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी स्वत: मातीचे आकर्षक बैल तयार करून आणले होते,शालेय पाठ्यपुस्तकातील बैल या विषयासंदर्भातील कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या.पोळा व बैल या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली,तान्हा पोळा या विषयाची शिक्षकांनी माहिती सांगितली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल घावट, शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सुषमा खेडकर, सचिन गावंडे,दिपक चव्हाण, शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी आदींची उपस्थिती होती.