शिक्षकांचे बाल लैंगिक शोषण प्रतिबंध सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न
शेगाव : स्थानिक श्री.गजानन महाराज इंग्रजी विद्यालय येथे अर्पण सेवाभावी संस्था मुंबई आणि जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ फेब्रुवरी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना बाल लैंगिक शोषण आणि त्याचा प्रतिबंध करणारा वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रम सक्षमीकरण प्रशिक्षण देण्यात येणार असुन प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षणाचे उध्दघाटन गटशिक्षणाधिकारी एन. डी.खरात यांनी केले,याप्रसंगी अर्पण सेवाभावी संस्था मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शक श्रद्धा दिलीप जाधव यांनी शिक्षकांना बाल लैंगिक शोषणाबाबतची ओळख,मूलं आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार,आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पोक्सो कायदा आणि तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शिक्षकांना प्रशिक्षण दिले तसेच मुलांच्या लैंगिक शोषणापासुन प्रतिबंधात्मक कार्यक्रम “वैयक्तिक सुरक्षा शिक्षण” वयोगट ४ ते १४ वयोगटातील मुलांसाठी ऑनलाईन ई-लर्न कोर्सचा परिचय आणि गोष्टीवर आधारित मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचे प्रतिबंधात्मक उपाय व मुलांचे जीवन कौशल्यवर आधारित माहिती देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे याबाबत प्रस्तुतीकरण,मुलांचे प्रकटीकरण हाताळणी,प्रकटीकरनाचे प्रकार आणि बाल लैंगिक शोषणाची प्रकरणे हाताळतांना शिक्षकांनी कोणत्या कौशल्याचा वापर करावा याबाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात यांच्या हस्ते प्रशिक्षणा संदर्भातील भित्तिपत्रके व प्रमाणपत्रे शिक्षकांना वितरीत करण्यात आले,सदर प्रशिक्षण संदर्भात दिपक अकोटकार व कांचन भांडे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत असलेल्या गटसाधन केंद्राचे कर्मचारी,विषय शिक्षक,साधन व्यक्ती रमेश वानखडे,विनोद वैतकार,विक्रम फुसे,श्रीकांत सोनोने,योगेश गणोरकार,राहूल ससाने व आदी कर्मचा-यांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.