ठाणे आणि नवी मुंबई शहर निर्बंधमुक्त
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने बुधवारी राज्य शासनाने करोना निर्बंध शिथिल करण्यासाठी निकष जाहीर केले.
ठाणे : राज्यात करोना निर्बंध शिथिलीकरणासाठी राज्य शासनाच्या निकषांनुसार महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले आहे. जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लशींचे प्रमाण हे राज्य सरकारच्या निकषांमध्ये बसत असल्याने येथील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय गुरुवारी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे ठाणे आणु नवी मुंबई महापालिका क्षेत्र निर्बंधमुक्त झाले आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने बुधवारी राज्य शासनाने करोना निर्बंध शिथिल करण्यासाठी निकष जाहीर केले. जिल्ह्याच्या लसीकरण टक्केवारीमध्ये करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा ९० टक्क्यांपेक्षा अधिक, दुसरी मात्रा ७० टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याचा करोना बाधितांचे प्रमाण१० टक्क्यांपेक्षा कमी असावे आणि प्राणवायुंच्या खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेल्या असाव्यात असे चार निकष आहेत. ते पूर्ण करणाऱ्या १४ जिल्ह्यांच्या यादी मध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश नाही. ठाणे जिल्हा चार पैकी तीन निकष पूर्ण करत असून लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ही ८६ टक्के आहे. केवळ या निकषामुळे जिल्ह्याचा समावेश निर्बंधमुक्त जिल्ह्यांमध्ये होऊ शकला नाही. मात्र राज्य शासनाने निर्बंध शिथिल करताना महापालिका एक स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्या क्षेत्रात करोना निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार दिले आहे.
त्यानुसार, गुरुवारी जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे अतिरिक्त आयुक्त, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्राह्य धरण्यात आलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीची माहिली मात्रा ११३ टक्के तर दुसरी मात्रा ९८ टक्के जणांनी घेतला आहे तर ठाणे महापालिका क्षेत्रातही लशीची पहिली मात्रा ९० टक्के आणि दुसरी मात्रा ७४ टक्के नागरिकांनी घेतली आहे. राज्य शासनाच्या निकषांची पूर्तता होत असल्याने या दोन्ही महापालिका क्षेत्रात करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. उर्वरित महापालिका, नगरपालिका क्षेत्रात निर्बंध कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले.