Take a fresh look at your lifestyle.

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत ; अजित पवार यांचे वक्तव्य

राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहेत. वेळ लावण्याचे काहीच कारण नाही, असेही पवार म्हणाले.

0

पिंपरी : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई- वडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, या आशयाचे केलेले विधान म्हणजे त्यांची ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे करोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत. पाच वर्षांचा कालावधी विद्यमान आमदार पूर्ण करतील, असे वाटते.

मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र, राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहेत. वेळ लावण्याचे काहीच कारण नाही, असेही पवार म्हणाले. मुंबईत अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होते. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.आई वडिलांना शिव्या देणे ही आपली संस्कृती नाही. वास्तविक कोणीच कोणाला शिव्या देऊ नयेत. शिव्या दिल्याने बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न सुटणार आहेत का, पालकमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने असे बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. पाटील यांना मनासारखे मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज असावेत. त्यासाठीच ते अशी विधाने करत असावेत, अशी टीका यांनी केली.

….म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी धाडस केले

भाजपला १०५ आमदार निवडून आल्यानंतरही सरकार स्थापन करता आले नाही. मात्र, तरीही त्यांचे विविध मार्गांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोठी शक्ती कार्यरत होती. ती शक्ती पाठीशी होती म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी एवढे मोठे धाडस केले, असे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या यासंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कामगारांचे निलंबन मागे घेण्यात आले, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधण्यात आले असता, शिंदे-फडणवीस सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करणार, असे अजित पवार म्हणाले.

मदत करताना भेदभाव नको

नाशिक बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. दहीहंडीत गोविंदाला दहा लाखांची मदत केली होती. मदत देताना अशा प्रकारचा भेदभाव करू नये, नाशिक अपघातात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांचा काहीही दोष नव्हता, असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.