Take a fresh look at your lifestyle.

स्मशानभूमींसाठी 250 कर्मचारी दाखवले, पण प्रत्यक्षात प्रत्येकी एकच, ठेकेदारांकडून स्मशानातही ‘लोणी’ खाण्याचा प्रताप?

ठाणे महापालिका हद्दीतील स्मशाने आणि दफनभूमीत ठेकेदाराकडून कर्मचारी वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केला आहे.

0

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील स्मशाने आणि दफनभूमीत ठेकेदाराकडून कर्मचारी वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केला आहे. शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन पालिकेकडून उकळून फक्त एकच कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, स्मशान आणि दफनभूमीतही भ्रष्टाचार करणाऱ्यांची जागा जेलमध्येच आहे. त्यामुळे आयुक्तांनी या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून त्यांचे ठेके रद्द करावेत, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.

स्मशानभूमींमध्ये कामगार घोटाळ्याचा आरोप

दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीत अनागोंदी माजली असल्याची माहिती शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पठाण यांनी स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका सुलक्षणा पाटील, नगरसेवक हिरा पाटील यांच्यासह फडकेपाडा, खर्डी, शिळफाटा, पडले, डायघर, मोठी देसाई, तांबडीचा पाडा, खिडकाळी, पाटील पाडा, भोलेनाथ नगर या नऊ गावांतील स्मशानांची पाहणी केली. त्यावेळेस हा ‘कामगार घोटाळा’ उघडकीस आला, अशी माहिती शानू पठाण यांनी दिली.

‘ठेकेदारांनी पालिकेकडून 250 कर्मचाऱ्यांचे वेतन उकळले’

या स्मशानांची देखभाल, दुरूस्ती आणि सेवा देण्यासाठी अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदारांनी पालिकेकडून सुमारे 250 कर्मचाऱ्यांचे वेतन उकळून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मशानांमध्ये प्रत्येकी एकच कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. हा एकच कर्मचारी साफ सफाई तसेच अंत्यसंस्कार करीत असल्याचे दिसून आले. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन ठेकेदार आपल्या खिशात घालत असल्याचे शानू पठाण यांनी उघडकीस आणले.

एकाच कर्मचाऱ्याकडून सफाई आणि अंत्यसंस्काराचे काम

दरम्यान, “अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांना स्मशानातील साफसफाई, देखभाल याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, स्मशान-दफनभूमींची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. येथे सफाईची समस्या आहे. त्यास अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदार हेच जबाबदार आहेत. एकाच कर्मचाऱ्याकडून सफाई आणि अंत्यसंस्काराचे काम करून घेतले जात आहे. या अमृत इंटरप्रायजेस आणि अन्य ठेकेदारांनी भ्रष्टाचारातून स्मशाने दफनभूमी लाही सोडले नाही. ही बाब आज आपण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत आहोत”, असं शानू पठाण म्हणाले.

‘घोटाळा करणाऱ्या ठेकेदारांना जेलमध्ये डांबलं पाहिजे’

“यामध्ये कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झालेला असून त्याची कागदपत्रे आपण संबधितांना सोमवारी सादर करणार आहोत. स्मशान आणि दफनभूमीतही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या या ठेकेदारांचे शाळा सफाई, घंटागाडी, कचरा सफाई आदीचेही ठेके सुरू आहेत. त्या ठिकाणी अडीच हजार कामगार कर्मचारी दाखवले आहेत. त्यामुळे या ठेकेदारीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. म्हणूनच हे सर्व ठेके रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबले पाहिजे”, अशी मागणी शानू पठाण यांनी केली.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.