“मेरे लिए चले थे क्या..”, काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल करोना काळातील कामगारांच्या स्थलांतरावरून
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर जोरदार हल्लाबोल केलाय.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच करोना काळातील लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत कामगारांवर “मेरे लिए चले थे क्या..” या वक्तव्याचा आधार घेत सुरजेवाला यांनी मोदींना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी रोजगार, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचे मृत्यू, अर्थव्यवस्था, चीनचं अतिक्रमण या विषयांवर मोदी सरकारची कोंडी केली.
रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले, “गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आणि ‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोना आला. राजाने घोषणा केली आणि गरीब-कामगारांना संकटात अडकवलं. मंत्र्यांनी टीव्ही पाहण्यात आणि अंताक्षरी खेळण्यात समाधान मानलं. घर-कुटुंबावर संकट आलेलं पाहून नाडलेल्या हजारो कामगारांनी हजारो किलोमीटर पायी प्रवास केला. तेव्हा आम्ही मदतीचा हात दिला आणि आमचा धर्म पाळला.”
रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले, “आज संसदेतून स्पष्ट संदेश आलाय की “आम्ही एकही निवडणूक हरलो तर संपूर्ण ‘ईको सिस्टम’ काम करते”. याचा अर्थ स्पष्ट आहे, भयंकर बेरोजगारी, नियंत्रणाबाहेर महंगाई, घटतं उत्पन्न आणि प्रचंड गरीबीपासून दिलासा हवा असेल तर यांना निवडणुकीत हरवावं लागेल. तरच ईको सिस्टम काम करेल. लॉकडाउन लावत कामगारांसह त्यांच्या कुटुंबांना संकटात टाकणारे माफी मागण्याऐवजी मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांवरच प्रश्न उपस्थित करत आहेत.”
“सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. मात्र, संसदेत त्यावर निर्लज्जपणे हसत चेष्टा-मस्करी करण्यात आली. हे लक्षात ठेवलं जाईल. संसदेत भारत सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे असा मोठ्या प्रमाणात “प्रोपोगंडा” करण्यात आला. वास्तवात भारतात मुठभर में मुट्ठी भर अमीरों की ग़ुलाम सरकार है,” असंही सुरजेवाला यांनी नमूद केलं.