Take a fresh look at your lifestyle.

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, १४वर्षाच्या एका मुलाने नेहरूंचे प्राण वाचवले म्हणून ‘या’ राष्ट्रीय पुरस्काराची परंपरा चालू करण्यात आली होती

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण कारण किंवा इतिहास हा लपलेलाच असतो. मग ती गोष्ट अगदी छोट्यातील छोटी असो किंवा मोठ्यातील मोठी. मात्र आजच्या लेखात आज आपण प्रत्येक वर्षी लहान मुलांच्या धाडसाला दिला जाणाऱ्या बाल शौर्य पुरस्कारांची सुरुवात नक्की कशी, कुठे आणि का झाली? याची माहिती घेणार आहोत.

तर झाले असे कि, १९५७ साली दिल्लीत एका रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रमुख अतिथी होते.

या कार्यक्रमात १४ वर्षीय हरिश्चंद्र मेहरा यांची विशेष अतिथींच्या व्यवस्थेची जबाबदारीसाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा हरिश्चंद्र मेहरा नक्की कोण? तर हरिश्चंद्र मेहरा यांच्या धाडसामुळेच खऱ्या अर्थाने बाल शौर्य पुरस्काराला सुरुवात झाली होती.

दिल्लीतील रामलीला कार्यक्रम चालू असताना पंडित नेहरू ज्या तंबूतमध्ये होते, त्या तंबूला अचानक आग लागली. पण रामलीला पाहण्यात सर्वजण दंग असल्याने या आगीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अशावेळी हरिश्चंद्र मेहरा यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या तंबूत जाऊन पंडित नेहरूंचा हात धरून त्यांना बाहेर आणले. आणि त्यांचा जीव वाचवला.

नेहरूंना सुरक्षित ठिकाणी पोचवल्या नंतर परत पळत जाऊन हरिश्चंद्र मेहरा याने एका २० फूट उंचीच्या लांब तंबूच्या खांबावर चढून ज्या कपड्याला आग लागली होती तो बाजूला केला. आणि आग विझवली.

मात्र या सर्व घटनेत हरिश्चंद्र मेहरा याचा हात चांगलाच होरपळून निघाला होता. पण हरिश्चंद्र मेहरा याने पंडित नेहरूंचा जीव वाचवल्याने नेहरूंनी हरिश्चंद्र मेहराचा वयक्तिक सन्मान करण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी आपली मुलगी इंदिरा गांधी यांना हरिश्चंद्रच्या शाळेत जाऊन सन्मानित करण्यास सांगितले होते.

गोष्ट इथेच संपत नाही, तर पुढे हरिश्चंद्र मेहरा याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी १९५८ रोजी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुढे याच घटनेपासून दरवर्षी १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा २५ मुलांना त्यांनी संकटसमयी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी या पुरस्काराचे वितरण करण्याची परंपरा चालू झाली.

तर अशी होती लहानमुलांच्या धाडसाला प्रोत्साहित करणाऱ्या बाल शौर्य पुरस्काराची प्रेरणादायी गोष्ट. मात्र तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ज्या व्यक्तीमुळे हा पुरस्कार चालू झाला त्या व्यक्तीचे म्हणजेच हरिश्चंद्र मेहराचे पुढे नक्की काय झाले.

तर हरिश्चंद्र मेहरा हे आजच्या घडीला ७५ वर्षांचे असून, ते सध्या दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात राहतात. तसेच आजही त्या परिसरातले लोक त्यांना ‘नेहरू की जान बचानेवाला लडका’ म्हणून ओळखतात.

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.