Take a fresh look at your lifestyle.

गडचिरोलीतील हत्ती गुजरातला नेण्यास तीव्र विरोध ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

नक्षलवाद्यांचे माहेरघर अशी ओळख असलेले कमलापूर नंतर हत्ती कॅम्पमुळे ओळखले जाऊ लागले

0

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातला नेण्यास सरकार आग्रही असले तरी त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. नक्षलवाद्यांचे माहेरघर अशी ओळख असलेले कमलापूर नंतर हत्ती कॅम्पमुळे ओळखले जाऊ लागले. ही ओळख पुसण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याने याविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि जनसंघर्ष समितीने दिला आहे.

ताडोबा जंगलातील सहा हत्ती नुकतेच गुजरातला पाठवण्यात आले. या स्थलांतरणात वनाधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. येथील जंगल सफारीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी येथे येतात. मात्र, सरकार ही ओळख पुसण्याच्या तयारीत आहे.

‘हत्ती कॅम्प’साठी ओळखल्या जाणाऱ्या कमलापूरलाही हजारो पर्यटक येतात आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या हत्ती स्थलांतरित करण्याच्या  निर्णयामुळे लोकांच्या मनात संताप आहे. हत्तींसाठी होत असलेला खर्च राज्य सरकारला झेपणारा नाही, हत्तींपासून पर्यटकांचे संरक्षण करू शकत नाही, हत्ती सांभाळण्यासाठी माहूत आणि मनुष्यबळ तसेच पशुवैद्यक उपलब्ध नाही, अशी थातूरमातूर कारणे पुढे करण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकार हत्तींचे संगोपन करण्यास समर्थ नाही का, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

पेंग्विनसाठी लाखो रुपये खर्च

एका पेंग्विनमागे महिन्याकाठी लाखो रुपये खर्च केले जातात. असे सात पेंग्विन राज्य सरकारने पोसले आहेत. मग हत्तीचीच जबाबदारी झटकली का जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रात्री गुपचूप हत्ती हलवण्याचा प्रकार

सध्या रात्री परस्पर हत्ती गुजरातला हलवण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारने त्वरित योग्य तो निर्णय न घेतल्यास जनसंघर्ष समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.