Take a fresh look at your lifestyle.

२०० कोटींचा घोटाळा: दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसवर प्रश्नांचा भडिमार, सोपवली १०० प्रश्नांची यादी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

0

दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिन आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. दिल्ली पोलिसांनी २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी तिला किमान १०० प्रश्नांची यादी दिली आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही चौकशी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडिसला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावला आहे. तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर आज ती आपल्या वकिलांसोबत दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली. यापूर्वी २९ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावला होता. पण दोन्ही वेळी ती चौकशीसाठी हजर राहू शकली नाही.

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जॅकलिन तिच्या वकिलांच्या पथकासह आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाली. यावेळी दिल्ली पोलिसांकडून तिला एक लांबलचक प्रश्नांची यादी देण्यात आली. या यादीत किमान १०० प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू याबाबतचे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.

याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेनं पिंकी इराणी यांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे. तिनेच सुकेशची जॅकलिन फर्नांडिससोबत ओळख करून देण्यास मदत केल्याचे सांगितलं जातं. याप्रकरणाच्या अनेक बाबी स्पष्ट करण्यासाठी पोलीस जॅकलिन आणि पिंकीची एकत्रित चौकशी करू शकतात, अशी माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिली आहे. सुकेश चंद्रशेखर याने खंडणीसह फसवणुकीसारख्या विविध गुन्ह्यांतून मिळवलेल्या पैशातून जॅकलिनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी ईडीने यापूर्वी जॅकलिनची ७ कोटी २७ लाखांची संपत्ती जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.