Take a fresh look at your lifestyle.

सातारा : विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील कट्यार आणि खंजीर

ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

0

वाई येथील महागणपती मंदिर परिसरातील काशीविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

वाई येथील महागणपती मंदिरालगतच्या काशीविश्वेश्वर मंदिर परिसरात फरसबंदी घाटावर पुरातन विहीर आहे. त्यामध्ये नियमित पूर्वापार मोठा पाणी साठा असतो. या विहीरीतील पाण्याचा अनेक वर्ष उपसा बंद असल्याने आणि देखभालीअभावी पाण्याला दुर्गंधी येत होती. मंदिराचे विश्वस्त शैलेंद्र गोखले यांनी विहीरीची स्वच्छता करण्याच्या हेतूने गाळ काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून सुरुवात केली आहे. शुक्रवारी गाळ काढत असताना यावेळी सात कट्यारी आणि एक खंजीर आढळून आली.

त्यानंतर याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना गोखले यांनी कळवली. पोलिसांनी तात्काळ मंदिर परिसरात भेट देऊन पंचनामा करून हत्यारे ताब्यात घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, तहसीलदार रणजीत भोसले आणि सातारा येथील शिवाजी महाराज संग्रहालयाला माहिती देण्यात आली आहे. याबाबत शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी, या बाबत माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. ही हत्यारे छायाचित्र पाहून सतराव्या शतकातील असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच ही हत्यारे संग्रहालयाच्या ताब्यात घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.