Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद : सहा लाखांच्या बिस्किटांसह ट्रक लांबवून विकला

0

औरंगाबाद : ट्रकचालकानेच इतर साथीदारांच्या मदतीने सहा लाखांचे बिस्कीट भरून ट्रान्स्पोर्टला लावलेला ट्रक चक्क जळगावात स्क्रॅपमध्ये विकला. इतकेच नव्हे तर स्वतः जाऊन मालकाला ट्रक चोरी गेल्याचा बनाव सांगितला. मात्र, स्वतः लपून बसल्याने पोलिसांना संशय आला आणि तिथूनच त्याच्यासह आरोपींचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून आयशर ट्रक, सव्वाचार लाखांचे बिस्कीट आणि ५० हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली.

झाकीर अमीन खान (३७, रा. गेंदालाल मील, जैननगर, जळगाव), शेख बाबू शेख उस्मान (५२, रा. अबरारनगर, पिसादेवी), रिजवान शेख कलीम शेख (२५, रा. मिसारवाडी), शेख खलील शेख अब्दुल रहीम (६३, रा. कटकटगेट), यासीन खान मासूम खान (५१, रा. गणेशपुरी, मेहरूम जळगाव) आणि आमेर शेख बबलू शेख (रा. दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आमेर शेख हा फरार आहे.

पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी सांगितले, की राजेंद्र बाबुराव कचरे (३६, रा. माळीवाडा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी कचरे यांचा ओमसाईराम रोडलाइन्स नावाने ट्रान्स्पोर्ट व्यवसाय असून त्यांच्याकडे १३ ट्रक आहेत. त्यांच्या आयशर ट्रकवर (एमएच २०, ईजी ४२८७) आरोपी शेख बाबू शेख उस्मान हा ३ जुलैपासून चालक म्हणून कामाला होता.

असा रचला बनाव

११ जुलैरोजी त्याने नागपूरहून भिवंडीला जाण्यासाठी बिस्किटाने ट्रक भरला. १४ जुलैला सायंकाळी सावंगी बायपास रस्त्यावरील नीळकंठ एचपी पेट्रोलपंप येथे डिझेल भरण्यासाठी तो थांबला. १६ जुलैच्या सकाळपर्यंत तो तेथेच थांबला होता. तेथूनच त्याने साथीदारांसह कट रचून सहा लाखांचे बिस्कीट लंपास केले. ट्रक जळगाव येथील स्क्रॅप सेंटरमध्ये नेऊन एक लाख २० हजार रुपयांत विकला. त्यानंतर १९ जुलैला रात्री मालक राजेंद्र कचरे यांची भेट घेऊन ट्रक चोरीला गेल्याचे सांगितले. २० जुलैरोजी कचरे यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच चिकलठाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, संशयित चालक शेख बाबू शेख उस्मान हा एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती उपनिरीक्षक ढंगारे यांना मिळाली.

त्यांनी हवालदार दीपक देशमुख, सुधाकर बोचरे यांना सोबत घेऊन शेख बाबू याला उचलले. त्याला खाक्या दाखविताच त्याने आरोपी शेख खलील याच्याशी हात मिळवणी करून बिस्किटांची चोरी केली. त्यानंतर स्क्रॅपचा धंदा करणाऱ्या झाकीर अमीन खान याला ट्रक विकला. आरोपी रिजवान शेख व आमेर बबलू शेख यांनीही त्यांना मदत केली, अशी कबुली दिली. त्याआधारे ढंगारे यांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन झाकीर खानला पकडले. तेथूनच ट्रक जप्त केल्याचे निरीक्षक गात यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.